AMCActioncitynewsFarmersCrisis

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तातडीने काढा! शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कृषी विभागाचे आवाहन

१५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी नोंदणी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम; आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि सातबारा उतारा आवश्यक

शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळावा, तसेच पात्र शेतकरी अनुदान व आर्थिक मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी अमरावती विभागात ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेंतर्गत फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. विभागातील ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.

फार्मर आयडी हा शेतकऱ्याची स्वतंत्र डिजिटल ओळख दर्शविणारा विशिष्ट क्रमांक आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून कृषी योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा शासनाचा उद्देश आहे. विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी तसेच संबंधित प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार आहे.

फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा (७/१२) उतारा आणि आवश्यकतेनुसार आठ-अ उतारा ही कागदपत्रे सोबत ठेवावीत. नोंदणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ होईल.

शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळविताना कोणताही पात्र शेतकरी तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणींमुळे वंचित राहू नये, यासाठी कृषी विभागाकडून फार्मर आयडी नोंदणीवर भर दिला जात आहे. त्यामुळे अमरावती विभागातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता जवळच्या संबंधित नोंदणी केंद्रावर किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button