citynewsCrime Newslatestnewss breakingnewsMaharashtraNagpurNagpurCrime

नागपुरात बनावट नोटांचा कारखाना उघडकीस?

खरबीतील फ्लॅटवर वाठोडा पोलिसांचा छापा; ३७ लाखांच्या तयार बनावट नोटांसह ४८ लाखांच्या अर्धवट छापलेल्या नोटा जप्त

नागपूर शहरातील खरबी परिसरातील चैतन्येश्वरनगर येथे वाठोडा पोलिसांनी छापा टाकून ५०० रुपयांच्या मोठ्या प्रमाणातील बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर जप्त केला. या कारवाईत ३७ लाख रुपये किमतीच्या तयार बनावट नोटांसह एका बाजूने छापलेल्या सुमारे ४८ लाख रुपये किमतीच्या नोटाही आढळून आल्या. या प्रकरणी पुष्पम कृष्णा बंडाणे उर्फ भांडारकर (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

चैतन्येश्वरनगर येथे रमेश हरडे यांचे घर असून, सुमारे दीड वर्षांपूर्वी पुष्पम याने करारानुसार हे घर भाड्याने घेतले होते. जानेवारी महिन्यात भाडेकराराची मुदत संपली. मात्र, त्यानंतर पुष्पम याने घराचे भाडे देणे बंद केले. तसेच घर रिकामे करण्यासही नकार दिला. हरडे यांनी वारंवार भाड्याची मागणी केली; मात्र पुष्पम बेपत्ता झाल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली.

पुष्पमच्या संशयास्पद वर्तनामुळे हरडे यांना संशय आला. त्यांनी शनिवारी वाठोडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्यासह पोलिसांचे पथक चैतन्येश्वरनगरातील संबंधित फ्लॅटवर पोहोचले. फ्लॅटचे कुलूप तोडून तपासणी केली असता, तेथे नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या तयार बनावट नोटांची किंमत सुमारे ३७ लाख रुपये आहे. याशिवाय, एका बाजूने छापलेल्या ५०० रुपयांच्या सुमारे ४८ लाख रुपये किमतीच्या नोटाही पोलिसांच्या हाती लागल्या. त्यामुळे या कारवाईत एकूण ८५ लाख रुपये किमतीच्या बनावट आणि अर्धवट छापलेल्या नोटा जप्त झाल्याचे समोर आले आहे.

पुष्पम हा बनावट नोटा तयार करण्याचे काम कोणासाठी करीत होता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि त्याने या नोटा यापूर्वी कुठे चलनात आणल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्याबरोबरच या प्रकरणामागील संपूर्ण जाळे उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button