लखनौच्या शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपी श्रद्धा दुबे नागपुरातून अटकेत

बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर उर्फ दानिशलाही बेड्या; यूपी एसटीएफ आणि नागपूर पोलिसांची संयुक्त कारवाई
नागपूर | सिटी न्यूज
लखनौ येथील व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश एसटीएफच्या वाराणसी युनिटने, लखनौ कमिशनरेट आणि नागपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत मुख्य आरोपी श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर उर्फ दानिश या तिघांना नागपुरातून अटक केली आहे.
नागपुरातील अपार्टमेंटमध्ये लपले होते आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी लखनौमधील अवध ग्रीन अपार्टमेंट येथून खाली पडल्याने व्यावसायिक शिवा शर्मा यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला. त्यानंतर हजरतगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील संशयित श्रद्धा दुबे ही शिवा शर्मा यांची लिव्ह-इन पार्टनर असल्याचे सांगितले जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती पोलिसांना चकवा देत सातत्याने ठिकाण बदलत होती.
आग्रा ते नेपाळपर्यंत शोधमोहीम
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी आग्रा आणि नेपाळपर्यंत छापे टाकले होते. आरोपींवर प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपी नागपुरातील चीचभवन परिसरातील ‘प्रोझोन पाम’ अपार्टमेंटमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संयुक्त पथकाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.
संयुक्त पथकाची कारवाई
या कारवाईला नागपूर क्राइम ब्रँचचे डीसीपी दीपक अग्रवाल यांनी दुजोरा दिल्याची माहिती आहे. आता या प्रकरणातील पुढील तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
शिवा शर्मा यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि या प्रकरणातील आरोपींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या हे प्रकरण तपासाधीन असून, आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.
सिटी न्यूज | नागपूर



