
रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन; डिसेंबरमध्ये अग्रवाल युवक-युवतींचे वैवाहिक परिचय संमेलन होणार
अमरावती प्रतिनिधी : अंबानगरी अमरावती येथे महाराजा अग्रसेन जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजस्थानी अग्रवाल समाजाच्या वतीने ७ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने महोत्सवाची सांगता झाली. या शोभायात्रेचा समारोप अग्रसेन भवन येथे झाला.

राजस्थानी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव अजय चौधरी, कोषाध्यक्ष संजय झुंझुनवाला आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या प्रयत्नांतून यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात ध्वजारोहण, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, ‘नानीबाई को मायरो’, प्रसाद भोज, अग्रवाल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आणि आनंद मेळा यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी निघालेल्या भव्य शोभायात्रेत समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शोभायात्रेच्या समारोपानंतर अग्रसेन भवन येथे प्रसाद भोजाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, अग्रसेन स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, अग्रवाल जनजागृती समितीच्या अध्यक्षा समता केडिया, अग्रवाल सखी मंचच्या अध्यक्षा श्वेता केडिया आणि अग्रवाल युवा संघटनेचे अध्यक्ष कपिल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, अग्रसेन स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी येत्या डिसेंबर महिन्यात अमरावती येथे अग्रवाल समाजातील युवक-युवतींसाठी वैवाहिक परिचय संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या संमेलनामुळे विवाहेच्छुक युवक-युवतींना एकमेकांची माहिती जाणून घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
माजी खासदार नवनीत राणा आणि अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनीही कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत समाजबांधवांना महाराजा अग्रसेन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक एकता, सेवाभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपत यंदाचा महाराजा अग्रसेन जयंती महोत्सव उत्साहात पार पडला.



