
कालीमाता मंदिरात नऊ कुंडीय महायज्ञाला सुरुवात; दर्शनासाठी आजपासून भाविकांची गर्दी वाढणार
अमरावती : देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, अमरावती शहरातही सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्राचीन कालीमाता संस्थान, अंबामाता मंदिर आणि एकवीरा माता संस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कालीमाता मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा असून, घटस्थापनेच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू झाली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त अमरावती शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कालीमाता संस्थानचे विश्वस्त तथा पीठाधीश्वर डॉ. शक्ती महाराज यांच्या नेतृत्वाखाली पुढील नऊ दिवस मंदिरात धार्मिक विधी आणि पूजाअर्चा पार पडणार आहेत.

घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी कालीमाता मंदिरात नऊ कुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर देवीच्या मूर्तीची शहरातून उत्साहात शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती पीठाधीश्वर डॉ. शक्ती महाराज यांनी दिली.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पूजासाहित्य, फुले आणि प्रसादाची दुकाने सजली आहेत. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील नऊ दिवसांत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच देशासह महाराष्ट्र आणि अमरावती जिल्ह्यात सुख, समृद्धी व प्रगती नांदावी, अशी प्रार्थना डॉ. शक्ती महाराज यांच्यासह भाविकांनी आई कालीमातेकडे केली आहे.



