
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या प्रकरणात अटक; १९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, बोराळा धरणाच्या पाईपलाईनचा वाद चिघळण्याची शक्यता
वाशिम प्रतिनिधी : शेतकरी नेते दामुअण्णा इंगोले यांना शिरपूर पोलिसांनी आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, रिसोड शहरासाठी बोराळा धरणावरून टाकण्यात येणाऱ्या नवीन पाईपलाईनला विरोध केल्यामुळेच राजकीय दबावातून ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी पूजा इंगोले यांनी केला आहे.
रिसोड शहरासाठी नवीन पाईपलाईन मंजूर करण्यात आली आहे. मात्र, बोराळा धरणातून या पाईपलाईनद्वारे वाढीव पाणीपुरवठा केल्यास परिसरातील १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावरून दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. यापूर्वी हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रस्तावित पाईपलाईनला विरोध दर्शविला होता.

दामुअण्णा इंगोले यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी पूजा इंगोले यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिसोडच्या नवीन पाईपलाईनला विरोध करून शेतकऱ्यांचे आंदोलन उभारल्यामुळे आठ वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून काढण्यात आले आणि राजकीय दबावातून अटक करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. ही कारवाई सूडबुद्धीच्या राजकारणातून करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दामुअण्णा इंगोले यांना अटक केल्यामुळे पाईपलाईनचे काम सुकर होईल, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी हा गैरसमज दूर करावा, असा इशारा पूजा इंगोले यांनी दिला आहे. उलट, या कारवाईनंतर शेतकरी अधिक तीव्रतेने विरोध करतील आणि रिसोड शहराला पाण्याचा थेंबही नेऊ देणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
रिसोड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या गरजा यांमधील समतोलाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. पाईपलाईनला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या दामुअण्णा इंगोले यांना अटक झाल्यानंतर या आंदोलनाला आणखी तीव्र स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या पाणीवाटपाबाबतच्या चिंतेवर कोणता तोडगा काढला जातो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



