Accident NewscitynewsMaharashtraNagpur gramin

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शिवकुंडात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन बहिणींचा लाडका भाऊ हरपला!

सुटीचा दिवस ठरला आयुष्याचा अखेरचा दिवस; वाघोली येथील घटनेने पवनी गावावर शोककळा

पवनी प्रतिनिधी : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याचा वाघोली येथील शिवकुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पीयूष विजय जिजोते असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पवनी गावावर शोककळा पसरली असून, दोन बहिणींचा लाडका भाऊ आणि कुटुंबाचा आधार हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पीयूष हा पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार असलेला पीयूष सुटीच्या दिवशी वडील विजय जिजोते यांच्यासोबत रेडिमेड कपड्यांच्या विक्रीसाठी आसपासच्या गावांत जात असे. शिक्षणासोबतच वडिलांना हातभार लावणाऱ्या पीयूषच्या भविष्याबाबत कुटुंबीयांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, एका दुर्दैवी घटनेने या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला.

सायंकाळी पीयूष मित्रांसोबत फिरायला गेला होता. यावेळी वाघोली येथील शिवकुंडात पोहण्याच्या मोहातून त्याने उंच दगडी कड्यावरून पाण्यात उडी घेतली. मात्र, उडी घेतल्यानंतर तो पुन्हा पाण्याच्या वर आला नाही. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या मित्रांमध्ये घबराट पसरली. त्यांनी तातडीने पीयूषच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीयूषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पीयूष हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. घरातील लाडका मुलगा, आई-वडिलांचा आधार आणि बहिणींचा जीव की प्राण असलेल्या पीयूषच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या वयात दहावीच्या परीक्षेची तयारी करून उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्ने पाहायची, त्याच वयात पीयूषचा जीवनप्रवास संपल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

शिवकुंडासारख्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाताना पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेचा अंदाज घेणे अत्यंत आवश्यक आहे. पोहण्याचा मोह किंवा उंचावरून पाण्यात उडी मारण्याचे धाडस जीवघेणे ठरू शकते, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button