AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

गोपालनगर अंडरपासजवळ तरुणावर दगडाने हल्ला करून लूट; दुचाकीसह मोबाईल आणि रोकड लंपास

पहाटे साडेतीनच्या सुमारास घटना; राजापेठ पोलिसांकडून अज्ञात दोन आरोपींचा शोध सुरू

अमरावती : गोपालनगर रेल्वे क्रॉसिंग अंडरपासजवळ दोन अज्ञात इसमांनी एका तरुणाला दगडाने मारून जखमी करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल आणि दुचाकीची चावी हिसकावून घेतल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश मनोहर राठोड, वय ३२ वर्षे, रा. शिरवाडी, ता. तिवसा, जि. अमरावती हे ३ ऑक्टोबर रोजी विविध कामानिमित्त अमरावतीत आले होते. त्यानंतर ते युनिकॉन मोटारसायकलने मायानगरी परिसरातील देशी दारूच्या दुकानाजवळ गेले होते.

४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजता त्यांना जाग आली. त्यानंतर ते मोटारसायकलने घरी जाण्यासाठी निघाले असता गोपालनगर अंडरपासजवळ दोन अनोळखी इसमांनी हात दाखवून लिफ्ट मागितली. फिर्यादीने मोटारसायकल थांबविल्यानंतर त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर दोघांनी त्यांना सोबत येण्यास सांगितले.

फिर्यादी त्यांच्यासोबत गोपालनगर रेल्वे क्रॉसिंग अंडरपासच्या बाजूने कच्च्या रस्त्याने काही अंतरावर गेले. त्यावेळी दोघांपैकी एका इसमाने फिर्यादीला पकडले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोक्यावर दगडाने मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील पाकिटातून ३ हजार रुपये, डाव्या खिशातील Vivo कंपनीचा मोबाईल फोन आणि युनिकॉन मोटारसायकल क्रमांक MH 27 ED 9568 ची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर फिर्यादीला घटनास्थळीच सोडून दोघेही पसार झाले.

जखमी अवस्थेत फिर्यादी मुख्य रस्त्यावर आले. त्यांनी एका अनोळखी व्यक्तीकडे मदत मागितल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. त्याचवेळी पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी फिर्यादीला उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, फिर्यादीने ज्या ठिकाणी मोटारसायकल उभी केली होती, त्या ठिकाणी दुचाकीही आढळून आली नाही. त्यामुळे आरोपी दुचाकी घेऊन पसार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन फिर्यादीची हकीकत जाणून घेतली. त्यानंतर गोपालनगर परिसरातील घटनास्थळ निश्चित करून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. फिर्यादीच्या जबानीवरून अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक 856/2026, कलम 309(6), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांकडून चोरीस गेलेल्या दुचाकी आणि मोबाईलचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

राजापेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button