Uncategorized

थकीत मालमत्ता करापोटी राजमहल लॉन व मंगल कार्यालय सील!

दस्तूरनगर येथील राजमहल लॉनकडे १३ लाख ९५ हजारांची करथकबाकी; वारंवार सूचना देऊनही भरणा न केल्याने महापालिकेची जप्तीची कारवाई

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला वेग आला असून, थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दस्तूरनगर परिसरातील राजमहल लॉन व मंगल कार्यालयाकडे तब्बल १३ लाख ९५ हजार ४५८ रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महापालिकेने बुधवारी, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सदर मालमत्ता सील केली.

महानगरपालिकेच्या पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील वॉर्ड क्रमांक C8 मधील मालमत्ता क्रमांक ९४८, राजमहल लॉन व मंगल कार्यालय, गणपती नगर, एमआयडीसी रोड येथे ही कारवाई करण्यात आली. संबंधित मालमत्ताधारकाकडे दीर्घकाळापासून मालमत्ता कराची मोठी रक्कम थकीत होती. महापालिका प्रशासनाकडून वारंवार कर भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, थकीत रक्कम जमा न झाल्याने अखेर प्रशासनाने जप्तीनाम्यानुसार मालमत्ता सील करण्याची कारवाई केली.

महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. शहरातील मालमत्ताधारकांनी वेळेत कराचा भरणा करावा आणि थकबाकी टाळावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कर वसुलीला प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर नियमानुसार जप्ती आणि सील करण्याची कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहायक क्षेत्र अधिकारी प्रवीण ठाकरे, दीपक सरसे, आकाश चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button