शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, महिला अत्याचार अन् सायबर गुन्ह्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार!

७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात अधिवेशन; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती
नागपूर | प्रतिनिधी
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळजन्य परिस्थिती, हवामान बदलाचे परिणाम, महिला अत्याचार, सायबर गुन्हे आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. येत्या ७ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज चालणार असून, विदर्भातील जनतेच्या विविध समस्यांना उत्तर देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीसह विविध विषयांवरील चर्चेचे नियोजन करण्यात आले. शेतकरी आत्महत्या, दुष्काळसदृश परिस्थिती आणि विविध विकास प्रकल्पांचा सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष फायदा कसा मिळेल, यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बदलत्या हवामानामुळे शेती आणि जनजीवनावर होणारे परिणाम यावरही सभागृहात चर्चा होणार असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील वाढते अत्याचार, कारागृहांमधील महिला कैद्यांची परिस्थिती, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि पेपरफुटीच्या घटनांसारखे प्रश्नही अधिवेशनात उपस्थित केले जाणार आहेत. विदर्भात अधिवेशन होत असल्याने या भागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय सभापतींच्या अखत्यारीत
विरोधी पक्षनेतेपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर गोऱ्हे म्हणाल्या की, केंद्रातील लोकसभेतील विरोधी पक्षाच्या अनुभवाप्रमाणेच राज्यातील विधानसभेचे नियमही स्वतंत्रपणे लागू होतात. विरोधी पक्षनेतेपदासंदर्भातील निर्णय विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून सरकारची दिशाभूल करण्याचा आरोप
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी महायुतीला मिळालेल्या विजयाचा उल्लेख केला. महायुतीला मिळालेला जनाधार आणि आमदारांकडून सुरू असलेले काम विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध पॅकेज आणि मदतीच्या योजना राबविल्या जात असताना विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियमितपणे नागपूरला येतात. गडचिरोली दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी उपस्थिती लावली होती. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गडचिरोलीतील कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य कायद्याबाबत डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेणार
महाराष्ट्रातील आरोग्यविषयक कायद्याच्या संदर्भात संयुक्त चिकित्सा समिती स्थापन करण्यात आली असून, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर काम सुरू असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. आमदार नितीन राऊत आणि राजू पोद्दार यांनी नागपुरात बैठक घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणेही ऐकून घेता आले. रुग्णांना न्याय मिळाला पाहिजे, डॉक्टरांसाठी योग्य आणि प्रभावी कायदे असले पाहिजेत, तसेच बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टिपू सुलतानच्या गौरवावरून अमित देशमुख यांच्यावर टीका
काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या विधानावर गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विधानांमधून त्यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. टिपू सुलतान यांच्या काळात हिंदू धर्मावर अत्याचार झाल्याची उदाहरणे असल्याचा दावा करत, अशा व्यक्तींचे विचार प्रत्यक्षात आणायचे आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमित देशमुख यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीविरोधात आवाज उठवणार
लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महिलांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून नंतर त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा प्रकार पुण्यात समोर आल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. मायक्रो फायनान्स कंपन्या माणुसकीचा विचार न करता महिलांकडून वसुली करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असून, महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांच्या माध्यमातूनही या विषयाचा पाठपुरावा केला जाणार आहे. महिलांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गरीब महिलांना खोटी आश्वासने देऊन फसविणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल, तसेच गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का लावण्याबाबतही सरकार मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून विरोधकांवर निशाणा
दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी विरोधकांनी कोणत्या विषयावर एकत्र यावे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांना काम करू न देता सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आरोप करण्याची भूमिका चुकीची असल्याची टीका त्यांनी केली.
सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ‘सटर-फटर लोकांनी केलेल्या आरोपांवर मी बोलणार नाही,’ अशा शब्दांत गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.
जनमंचच्या विरोधानंतरही अधिवेशन होणारच
नागपुरातील जनमंच संघटनेने हिवाळी अधिवेशनाला केलेल्या विरोधाबाबत विचारले असता, संबंधित संघटना कोणती आहे, याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. आमची बांधिलकी महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील जनतेशी आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसह विदर्भातील विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. मुंबई असो किंवा नागपूर, अधिवेशन हे घटनात्मक तरतुदींनुसारच होत असते. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन होणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
शायना एनसी प्रकरणावर बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला
शायना एनसी यांच्याशी संबंधित वादावर बोलताना गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार चालणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विचारांशी बांधिल आहे. शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेवर काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावरकरांच्या सन्मानासाठी काँग्रेसने माफी मागावी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या भूमिकांवरही गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत मांडलेल्या मतांमुळे चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान झाला पाहिजे. काँग्रेसकडून सातत्याने त्यांचा अपमान केला जात असल्याने काँग्रेस याबाबत माफी कधी मागणार, हा खरा प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या.
एकूणच, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील शेती, शेतकरी, महिला सुरक्षा, आरोग्य, बेरोजगारी आणि सायबर गुन्हे यांसारख्या जनहिताच्या मुद्द्यांसोबतच राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसादही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.



