AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

राजकमलचा पूल बंद, आता उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या मधोमध खोदकाम!

वालकट कंपाउंड परिसरात जेसीबीद्वारे मोठा खड्डा; सूचना फलकांचा अभाव, वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांची कसरत

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, नागरिकांना एकामागून एक वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहराची जीवनवाहिनी मानला जाणारा राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढलेला असताना आता वालकट कंपाउंड परिसरातील उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या मधोमध खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३ वाजता वालकट कंपाउंड येथील उड्डाणपुलाखाली इर्विन रुग्णालय परिसरातील नाल्याचे पाणी काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू करताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे, खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी कोणतेही सूचना फलक किंवा दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खोदण्यात आल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच खोदकामातून निघालेला मलबा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागाही कमी होत आहे.

या कामासाठी विक्रम कुमार नामक ठेकेदाराचा जेसीबी वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एवढ्या वर्दळीच्या मार्गावर खोदकाम करताना वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि नागरिकांच्या सोयींचा विचार करण्यात आला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजकमल चौकातील पूल बंद असल्यामुळे शहरातील वाहतुकीचे नियोजन आधीच विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यायी मार्गांवरही रस्त्याच्या मधोमध खोदकाम सुरू असल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची तातडीने पाहणी करून योग्य सूचना फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी. तसेच खोदकामाचा मलबा त्वरित हटवून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button