Uncategorized

महागाईचा भडका! गॅस अन् विजेचे दर परवडेनात; आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी पुन्हा चुलीचा आधार!

वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमती आणि वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले; बडनेऱ्यात पारंपरिक चुलीचा वापर वाढला

बडनेरा : महागाईच्या वाढत्या झळांनी सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असताना आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका वाढू लागल्याने आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज भासू लागली आहे. मात्र, गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि विजेच्या बिलाचा वाढता भार पाहता गरम पाणी मिळवणेही सर्वसामान्यांसाठी खर्चिक ठरत आहे. परिणामी, आधुनिक गॅस शेगडी आणि इलेक्ट्रिक गिझरला पर्याय म्हणून अनेक कुटुंबांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

एकेकाळी ग्रामीण भागातील घराघरांत चुलीवर पाणी तापवणे ही नित्याची बाब होती. कालांतराने गॅस शेगडी, इलेक्ट्रिक गिझर आणि आधुनिक उपकरणांनी या पारंपरिक पद्धतीची जागा घेतली. मात्र, सध्या वाढत्या महागाईमुळे परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. सकाळी संपूर्ण कुटुंबासाठी आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गॅस किंवा विजेचा वापर करण्यापेक्षा लाकूड आणि गोवऱ्यांच्या साहाय्याने चुलीवर पाणी तापवणे अनेक कुटुंबांना अधिक परवडणारे वाटत आहे.

सध्या १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९७५ रुपये ५० पैसे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर २ हजार ९३५ रुपये ५० पैसे असल्याने घरगुती अर्थसंकल्पावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच विजेच्या वाढत्या दरांमुळे गिझरचा वापरही महागडा ठरत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करताना काटकसर करावी लागत असतानाच आंघोळीच्या पाण्यासाठीही नागरिकांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे.

विशेष म्हणजे, एकेकाळी आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करताना मागे पडलेली चूल आता पुन्हा घराघरांत दिसू लागली आहे. गॅस आणि विजेचा खर्च वाचवण्यासाठी काही कुटुंबे लाकूड आणि गोवऱ्यांचा वापर करून पाणी गरम करत आहेत. महागाईचा परिणाम आता केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिलेला नसून दैनंदिन जीवनातील साध्या गरजांवरही होत असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे.

एकीकडे डिजिटल भारत, आधुनिक सुविधा आणि विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे सामान्य नागरिकाला आंघोळीचे पाणी गरम करण्यापूर्वीही खर्चाचा विचार करावा लागत आहे. गॅस महाग, वीज महाग आणि जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढलेले असताना घरखर्चाचा ताळमेळ बसवायचा तरी कसा, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.

महागाईच्या वाढत्या झळांमुळे आधुनिक सुविधांऐवजी पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घेण्याची वेळ नागरिकांवर येणे ही चिंतेची बाब आहे. गॅस, वीज आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या खर्चातून सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळणार, असा सवाल बडनेऱ्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button