AccidentNewscitynewsMaharashtraNagpurNagpurPolice

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती अवनीचा अपघाती मृत्यू; न्यायासाठी डीसीपी कार्यालयासमोर आणला पार्थिवदेह!

नगरसेवक व स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्या नेतृत्वात कुटुंबीय, खेळाडू आणि नागरिकांचे जोरदार आंदोलन; अपघातातील दुचाकीस्वाराला पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी

नागपूर : राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून नागपूरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अवघ्या १७ वर्षीय अवनी मुकेश बघेल हिचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संघर्षनगर चौकात भरधाव दुचाकीच्या धडकेत अवनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांसह क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र, अपघातातील दुचाकीस्वाराला पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. अखेर नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्या नेतृत्वात अवनीचा पार्थिवदेह घेऊन कुटुंबीय, खेळाडू आणि नागरिक थेट झोन-४ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर पोहोचले आणि जोरदार आंदोलन केले.

संघर्षातून घडवली राष्ट्रीय स्तरावर ओळख

अवनी ही सेपक टकरा (Sepak Takraw) या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावान खेळाडू होती. तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करत सात ते आठ वेळा सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी तिने पदकाची कमाई केली होती. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चार ते पाच वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत सुवर्णपदके पटकावली होती. खेलो इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावरही तिने आपल्या खेळाचे कौशल्य दाखवले होते.

अवनीच्या या यशामागे मोठा संघर्ष होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिला खेळासाठी आवश्यक बूट घेणेही आई-वडिलांना शक्य होत नव्हते. मात्र, आर्थिक अडचणींवर मात करत अवनीने खेळ सुरू ठेवला. तिची क्रीडा अकादमी आणि सहकारी खेळाडूंनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. तिच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा असतानाच अपघाताने तिचे आयुष्य हिरावून घेतले.

आरोपीला सोडल्याच्या माहितीने कुटुंबीय संतप्त

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला रात्री सात ते आठ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात नेले होते. मात्र, मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती सकाळी कुटुंबीयांना मिळाली. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्याशी संपर्क साधला.

वसीम खान यांनी तत्काळ नंदनवन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित व्यक्तीला सूचना पत्र देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

न्यायाच्या मागणीसाठी डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन

यानंतर अवनीचे कुटुंबीय, क्रीडा अकादमीतील सहकारी खेळाडू आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने वसीम खान यांच्याकडे पोहोचले. वसीम खान यांनी सर्वांना सोबत घेऊन झोन-४ च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, डीसीपी कार्यालयात त्या उपस्थित नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी वाढली. वसीम खान यांनीही त्यांच्याशी दोन वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

अखेर संतप्त कुटुंबीय, खेळाडू आणि नागरिकांनी वसीम खान यांच्या नेतृत्वात अवनीचा पार्थिवदेह रुग्णवाहिकेतून थेट झोन-४ डीसीपी कार्यालयासमोर आणला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अपघाताला कारणीभूत असलेल्या दुचाकीस्वाराला तातडीने पुन्हा ताब्यात घ्यावे आणि त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

व्हिडिओ कॉलवरून बहिणींनी केली आरोपीची ओळख

आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त आणि नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संबंधित दुचाकीस्वाराला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. यावेळी वसीम खान यांनी अवनीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या बहिणींकडून व्हिडिओ कॉलवर संबंधित व्यक्तीची ओळख पटवून घेतली. दोन्ही बहिणींनी व्हिडिओ कॉलवरील व्यक्ती ही अपघातात सहभागी असलेली दुचाकीस्वार असल्याचे ओळखले.

मात्र, अवनीच्या कुटुंबीयांनी आरोपीला पुन्हा सोडण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली. अवनीच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट होऊन कुटुंबीयांना योग्य कारवाई व मदतीचे आश्वासन मिळेपर्यंत संबंधित व्यक्तीला मुक्त करू नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर अवनीचा पार्थिवदेह घरी नेण्यात आला आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

राष्ट्रीय खेळाडूच्या मृत्यूने उपस्थित केले रस्ते सुरक्षेचे प्रश्न

अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवणाऱ्या अवनीचा अशा प्रकारे झालेला अंत हा तिच्या कुटुंबासाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. ज्या मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर नागपूर आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले, तिच्या मृत्यूनंतर न्यायासाठी कुटुंबीयांना रस्त्यावर उतरावे लागल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य वसीम खान यांनी अवनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. अवनीने मिळवलेली पदके तिच्या संघर्षाची आणि प्रतिभेची साक्ष देत राहतील; मात्र तिच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची वेदना कुटुंबीय आणि क्रीडा क्षेत्राला कायम सलत राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button