निर्मल उज्वल बँक प्रकरणाचा भडका! शेकडो ठेवीदारांचे ९ कोटींहून अधिक रुपये अडकले

चांदूर रेल्वेत संतप्त ठेवीदारांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा; १५ दिवसांत पैसे परत करण्याचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या संस्थेत शेकडो ठेवीदारांचे तब्बल ९ कोटी रुपयांहून अधिक पैसे अडकल्याचा अंदाज असून, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बचत खाते, मुदत ठेवी आणि दैनंदिन कलेक्शनची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आपल्या कष्टाच्या पैशांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पीडित ठेवीदारांनी एकत्र येत चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडक दिली. यावेळी ठेवीदारांनी आपली व्यथा मांडत अडकलेली रक्कम तातडीने परत मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक नागरिकांनी आपल्या भविष्यासाठी बचत खाते, मुदत ठेवी तसेच दररोजच्या कलेक्शनच्या माध्यमातून या संस्थेत पैसे जमा केले होते. मात्र, मागील सात ते आठ महिन्यांपासून ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शेकडो ग्राहकांचे ९ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
विशेष म्हणजे, ठेवीदारांनी आपल्या जमा पैशांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले. तसेच संबंधित संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.
यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत ठेवीदारांची अडकलेली रक्कम परत मिळाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात पीडित ठेवीदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली नाराजी व्यक्त केली.
आयुष्यभराची कमाई आणि भविष्यासाठी साठवलेले पैसेच मिळत नसल्याने ठेवीदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस भूमिका घेते आणि शेकडो ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी परत मिळतात, याकडे चांदूर रेल्वेकरांचे लक्ष लागले आहे.
बाईट : नितीन गवळी – ग्राहक



