सिटी न्यूजच्या बातमीचा दणका! मोर्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस

मुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त छतावर रंगली होती ओली पार्टी; ड्रोन कॅमेऱ्यातून सिटी न्यूजने प्रकार आणला होता समोर, जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी मागवला खुलासा
मोर्शी | प्रतिनिधी
मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर मुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कथित ओली पार्टीचा प्रकार सिटी न्यूजने समोर आणल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी मोर्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावून सविस्तर लेखी खुलासा मागवला आहे. त्यामुळे सिटी न्यूजच्या बातमीचा प्रशासनावर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत मोर्शी नगरपरिषदेच्या शासकीय कार्यालयाच्या छतावर मुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त ओली पार्टी रंगल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचे व्हिडिओ आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलेले विशेष चित्रीकरण सिटी न्यूजने १४ नोव्हेंबर रोजी प्रसारित केले होते. या बातमीमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण झाली होती.

सिटी न्यूजने हा प्रकार जनतेसमोर आणल्यानंतर जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी तातडीने दखल घेत संबंधित मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शासकीय कार्यालयाच्या छतावर अशा प्रकारची पार्टी आयोजित करण्यामागील कारणे काय, याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे.
नोटीसमध्ये राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला असून, अशा परिस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांकडून संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यालयीन शिस्त राखणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित प्रकारामुळे शासकीय कार्यालयाची प्रतिमा मलिन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मुख्याधिकाऱ्यांना १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून सविस्तर लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सादर करण्यात येणारा खुलासा असमाधानकारक आढळल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.
एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी संघर्ष करीत असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयाच्या छतावर झालेल्या या पार्टीचा प्रकार निश्चितच चर्चेचा विषय ठरला आहे. सिटी न्यूजने हा प्रकार पुराव्यांसह समोर आणल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नोटीस बजावल्याने आता मुख्याधिकारी आपल्या खुलाशात काय भूमिका मांडतात आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



