फक्त ४ तासांत राजापेठ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा उघडला; दोघे आरोपी ताब्यात

गोपालनगर अंडरपासजवळ तरुणाला मारहाण करून रोकड, मोबाईल आणि दुचाकी लुटली; पोलिसांची तत्पर कारवाई
अमरावती : गोपालनगर अंडरपासजवळ तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड, मोबाईल आणि दुचाकी जबरीने हिसकावून नेल्याच्या घटनेचा राजापेठ पोलिसांनी अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश मनोहर राठोड, वय ३२ वर्षे, रा. शिरवाडी, ता. तिवसा, जि. अमरावती हे ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपालनगर अंडरपासजवळून जात होते. यावेळी दोन इसमांनी त्यांना हात दाखवून थांबवले. त्यानंतर फिर्यादीने त्यांना दुचाकीवर बसवून सोबत नेले.
आरोपानुसार, संबंधित इसमांनी फिर्यादीला कच्च्या रस्त्यावर नेले. त्यापैकी एका इसमाने फिर्यादीला पकडून ठेवले, तर दुसऱ्याने त्याच्या पायावर लाथा मारून त्याला जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील ३ हजार रुपये रोख रक्कम आणि Vivo कंपनीचा मोबाईल तसेच दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून दोघेही पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक पुराव्याशिवाय अवघ्या ४ तासांत गुन्ह्याचा छडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही तांत्रिक पुराव्याचा आधार नसताना केवळ प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
तपासादरम्यान आकाश गौतम तंतरपाडे, वय २६ वर्षे, रा. गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ, अमरावती आणि अमोल ऊर्फ बंटी रमेश सावर्कर, वय २३ वर्षे, रा. महाजनपुरा, अमरावती या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून युनिकॉर्न दुचाकी, रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ५३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ श्याम धुगे, सहायक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख सपोनि नितीन शिंदे आणि डीबी पथकाने केली.
कारवाईत पोलीस अंमलदार मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खरे, रवि तेलघटीकर, शशिकांत शेलके, अंकुश काळे, अमोल बडबड, आकाश देशमुख, प्रशांत बेलकर, एपीक खान, आकाश यादव, सतीश टप्पे, पंकज गाढे, अमोल देशमुख आणि अर्जुन कदम यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.



