नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा आम्ही जिंकणार; सुधाकर कोहळेंचा विश्वास

गेल्या 35 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता; अनिल सोले माझे गुरू, त्यांची नाराजी नाही
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या 35 वर्षांपासून आपण भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत असून, गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात सातत्याने संपर्क आणि नोंदणीचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधाकर कोहळे म्हणाले की, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी आपल्यावर नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर वर्षभर सातत्याने मतदारसंघात फिरून काम केले. अपेक्षित मतदार नोंदणी झाल्याचा दावा करत, यावेळी विजयाबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले.
गेल्या निवडणुकीत ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आल्याचेही कोहळे यांनी सांगितले. पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
अनिल सोले माझे गुरू
भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांच्याबाबत बोलताना सुधाकर कोहळे यांनी ते आपले गुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असून, अनिल सोले यांची कोणतीही नाराजी नसल्याचे कोहळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपने सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात इतर पक्ष आणि संघटनांकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.



