शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी महसूलमंत्री बांधावर; “आम्ही जगायचे कसे?”

कपाशीवर ७५ हजारांचा खर्च, उत्पन्न १५ हजारांपेक्षाही कमी; पिकांच्या नुकसानीची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी
भोकरदन | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शुक्रवारी रात्री झालेल्या या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीसोबतच वाढलेल्या उत्पादन खर्चाची व्यथा महसूलमंत्र्यांसमोर मांडली.
यावेळी मलकापूर येथील शेतकरी पंडित वाघमारे यांनी कपाशीच्या पिकासाठी झालेल्या खर्चाची माहिती देताना आपली व्यथा मांडली. “दोन एकर कपाशीसाठी औषधे, खते आणि मजुरीवर सुमारे ७५ हजार रुपये खर्च झाले. मात्र, उत्पन्न १५ हजार रुपयेही होणार नाही. उभे पीक काढण्यासाठीही आता पदरमोड करावी लागणार आहे. साहेब, आम्ही जगायचे तरी कसे?” असा सवाल त्यांनी महसूलमंत्र्यांसमोर उपस्थित केला.
गट क्रमांक १०९ मधील पिकांची पाहणी
महसूलमंत्री बावनकुळे यांनी गट क्रमांक १०९ मधील सुमन वाघमारे आणि पंडित वाघमारे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती आणि नुकसानीची पाहणी करताना त्यांनी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांमध्ये वस्तुस्थितीची अचूक नोंद होण्याचे निर्देश दिले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आशा पांडे, संतोष लोखंडे, मुकेश पांडे, नंदकुमार गिरहे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रस्ता अडवल्याच्या तक्रारीवर कारवाईचे निर्देश
नांजा शिवारातील रस्ता तलाठ्याने अडवल्याची तक्रारही यावेळी शेतकऱ्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली. नोटीस देऊनही संबंधित तलाठी दखल घेत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या तक्रारीची दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली. तसेच याप्रकरणी तहसीलदार आणि संबंधित तलाठ्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले.
भोकरदनच्या पाणीपुरवठा योजनेबाबत बैठक
भोकरदन शहरातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्नही यावेळी समोर आला. या योजनेबाबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.
दरम्यान, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि पंचनाम्यातील नोंदी यामध्ये तफावत राहू नये, यासाठी प्रशासनाने अचूक आणि वस्तुनिष्ठ नोंद करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गायरानावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश
बेलोरा येथील गायरान जमिनीवर पोलीस कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकेने कथित अतिक्रमण केल्याची तक्रारही महसूलमंत्र्यांकडे करण्यात आली.
या तक्रारीची दखल घेत संबंधित अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला देण्यात आले.
“छावणी नको, गावातच चारा द्या”
दरम्यान, बदनापूर तालुक्यातील वरूडी शिवारातही महसूलमंत्री बावनकुळे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा छावणी उभारण्याऐवजी गावपातळीवरच चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
पावसाअभावी सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि मेंढपाळ अडचणीत आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने गावपातळीवर चाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
महसूलमंत्र्यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडल्या असून, पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांनंतर शासनाकडून कोणती मदत जाहीर होते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



