
यवतमाळच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूला नवे वळण; कुटुंबीयांकडून मानसिक छळ व जातीय भेदभावाचे आरोप, IIT प्रशासनाकडून आरोप फेटाळले
यवतमाळ जिल्ह्यातील साहिल रविंद्र वाकोडे या IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन आणि ChatGPT वापरल्याचा आरोप झाल्यानंतर काही तासांतच साहिलचा हॉस्टेलच्या खोलीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी काही प्राध्यापक आणि संस्थेच्या प्रशासनावर मानसिक छळ तसेच जातीय भेदभावाचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

साहिल हा IIT मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळल्याचे IIT प्रशासनाकडून सांगण्यात आले. संस्थेच्या म्हणण्यानुसार, त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा केली आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर तत्काळ प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर साहिल हॉस्टेलमध्ये गेला आणि काही वेळाने तो मृतावस्थेत आढळला.

दरम्यान, साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पोलिसांकडे तक्रार देताना साहिलला जातीय भेदभाव आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीवरून प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह इतरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, IIT प्रशासनाने जातीय भेदभावाचा आरोप नाकारला असून साहिलने संस्थेच्या SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे अशा प्रकारची तक्रार केली नव्हती, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणानंतर IIT परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. तपास क्राईम ब्रँचकडे सोपवल्यानंतर पथकाने साहिलच्या हॉस्टेलच्या खोलीची पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच परीक्षेच्या वेळेतील CCTV फुटेजही तपासण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, CCTVमध्ये परीक्षेच्या शेवटच्या काही मिनिटांत साहिलकडे प्राध्यापकांकडून चौकशी होत असल्याचे आणि त्यानंतर तो हॉस्टेलच्या दिशेने जात असल्याचे दिसत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, IIT मुंबईने यापूर्वी जारी केलेल्या निवेदनाबाबतही स्पष्टीकरण देत, घटनेपूर्वीच्या परिस्थितीबाबत अंतिम तपास पूर्ण होण्यापूर्वी तपशील मांडणे योग्य नसल्याचे मान्य केले आहे. प्रकरणातील सर्व बाजू, CCTV फुटेज, संबंधित व्यक्तींची विधाने आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तपास केला जात आहे. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी नेमके काय घडले आणि त्यानंतरच्या घटनांचा साहिलच्या मृत्यूशी काय संबंध होता, याचा उलगडा क्राईम ब्रँचच्या तपासातून होणे अपेक्षित आहे.



