citynewsMaharashtraNagpurNagpurCrime

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा

लग्नास टाळाटाळ करत फोटो-व्हिडिओ भावी स्थळाला पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप; धंतोली पोलिसांकडून तपास सुरू

नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नास टाळाटाळ करून तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या भावी स्थळाला पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या मानसिक त्रासातून तरुणीने आत्महत्या केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रकाश पॅलेस, आनंद आश्रमजवळ एका तरुणीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पाहणी करण्यात आली होती. या प्रकरणी सुरुवातीला मर्ग दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आत्महत्येपूर्वी तरुणीने तिचा प्रियकर सचिन दहाट याला व्हिडिओ कॉल केल्याची माहिती समोर आली.

यानंतर मृत तरुणीची आई सीमा धवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, सचिन दहाट आणि तरुणी यांच्यात २०१५ पासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी लग्नासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, तरुणीने दुसरीकडे लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ भावी वराला पाठवण्याची धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात होती आणि त्यातूनच तिने १९ ऑगस्ट २०२६ रोजी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आईच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी सचिन दहाट याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि आत्महत्येमागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button