citynewsMaharashtraNagpur

नागपुरात सट्टा मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

तीन जण ताब्यात; ५१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त, अंबाझरी पोलिसांची कारवाई

नागपूर : शहरात सट्टा मटका खेळविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळपेठ मार्केट परिसरात अंक सट्ट्याचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सट्टा खेळविणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या एस्कॉर्ट पथकाला गोकुळपेठ मार्केट परिसरातील एका झोपडीच्या आडोशाला अंक सट्ट्याचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी यांनी घटनास्थळी जाऊन माहितीची खातरजमा केली. त्यावेळी काही जण अंकचिठ्ठ्या लिहित असल्याचे, तर काही जण परिसरात उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर अंबाझरी पोलिसांचे पथक आणि पंचांना घटनास्थळी बोलावून जुगाराच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगार खेळणारे इसम घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, जुगार खेळविणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जितेंद्र महादेव वागाडे, संतोष महादेव वागाडे आणि सागर रमेश गवई अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून रोख रक्कम, तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, शारदा भोपाळे आणि पोलीस पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास अंबाझरी पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button