AMCActionAmravaticitynews

गणेश विसर्जनासाठी अमरावती प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

आमदार रवि राणांकडून छत्री तलाव, दस्तुरनगर चौक परिसराची पाहणी; स्वच्छता, आरोग्य, अग्निशमन आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा

अमरावती : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आणि प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रमुख विसर्जनस्थळ असलेल्या छत्री तलाव तसेच दस्तुरनगर चौक परिसराची आमदार रवि राणा यांनी सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी स्वच्छता, आरोग्य, अग्निशमन, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि नागरिक या परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, नागरिकांची गैरसोय होऊ न देणे आणि विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी विसर्जनाच्या नियोजनाची सविस्तर माहिती आमदार रवि राणा यांना दिली. विसर्जनस्थळावरील स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरिकांसाठी आवश्यक सोयी, अग्निशमन विभागाची सज्जता तसेच विविध विभागांमधील समन्वयाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनांबाबतही चर्चा झाली. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी वैद्यकीय पथके आणि अग्निशमन विभागाची तयारी यांचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन, आरोग्य आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेता नाना आमले, विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

गणेश विसर्जनाचा दिवस शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button