Amaravti GramincitynewsCrime News

वैशाली मेहरे मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण

पती ललित मेहरेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल; तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून होणार स्पष्ट

अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा गावात बंद घरात संशयास्पद अवस्थेत ४५ वर्षीय वैशाली सुनील मेहरे यांचा मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. वैशाली मेहरे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्यांचे पती ललित मेहरे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारीनुसार, ललित मेहरे हा मद्यपानाच्या नशेत वैशाली यांच्यासोबत वारंवार मारहाण करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला होता. वैशाली यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मृत्यूनंतर घराला बाहेरून कुलूप लावून ललित मेहरे घटनास्थळावरून निघून गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वैशाली यांचे भाऊ यवतमाळ जिल्ह्यातील पाटणगाव येथील दिनेश ठाकरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विवाहानंतर वैशाली या घरगुती हिंसाचारामुळे त्रस्त असल्याचे आणि यापूर्वीही त्यांनी माहेरी येऊन पतीकडून होत असलेल्या मारहाणीबाबत माहिती दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वैशाली मेहरे यांचे हे तिसरे लग्न असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ललित मेहरेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, वैशाली मेहरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, घटनेच्या वेळी नेमके काय घडले आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता कितपत आहे, हे पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत ऊरलागोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश करे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button