गणेश चतुर्थीनिमित्त टेकडी गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी

नागपूरच्या ग्रामदैवताची विधिवत पूजा-अर्चा आणि आरती; पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
नागपूर : गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वाला आज नागपुरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. नागपूरचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या टेकडी गणपती मंदिर येथे श्री गणरायांची विधिवत पूजा-अर्चा आणि आरती करण्यात आली. गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सीताबर्डी परिसरातील टेकडी गणपती मंदिर हे लाखो नागपूरकरांचे श्रद्धास्थान आहे. वडाच्या झाडाखाली स्थापित असलेली श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गणेश चतुर्थीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांनी गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.
गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही गणेशोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला असून, गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.



