AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

डफरीन अग्निकांडाच्या चौकशी अहवालावरच प्रश्नचिन्ह! स्प्रिंकलरबाबत तज्ज्ञांचा गंभीर आक्षेप

मॅन्युअल मोडवर असल्याने स्प्रिंकलर सुरू झाले नाहीत, हा निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा; नवजात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अमरावती | City News

अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील एसएनसीयू अग्निकांडाच्या चौकशी समितीच्या अहवालावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्प्रिंकलर मॅन्युअल मोडवर असल्यामुळे ते कार्यान्वित झाले नाहीत, असा चौकशी समितीचा निष्कर्ष असल्याचे समोर आले आहे. मात्र अग्निशमन क्षेत्रातील तज्ज्ञांनी हा निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आणि संशयास्पद असल्याचा दावा केल्याने या काळरात्री नेमके काय घडले, याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून, त्यामध्ये फायर अलार्म आणि स्प्रिंकलर मॅन्युअल मोडवर असल्याने ते कार्यान्वित झाले नसल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र अग्निशमन तज्ज्ञांच्या मते, स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा मॅन्युअल मोडवर ठेवण्यात आल्याची बाबच तांत्रिकदृष्ट्या संशयास्पद आहे. स्प्रिंकलर हेडमध्ये थर्मल बल्ब असतो. परिसरातील तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा वाढल्यानंतर हा बल्ब फुटतो आणि त्यानंतर स्प्रिंकलरमधून पाण्याचा मारा सुरू होतो, अशी तज्ज्ञांची भूमिका आहे.

त्यामुळे एसएनसीयूमधील तापमान अत्यंत उच्च पातळीवर पोहोचल्याचा दावा असताना स्प्रिंकलर का कार्यान्वित झाले नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः नवजात बालकांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या घटनेत अग्निसुरक्षा यंत्रणा नेमकी कोणत्या कारणामुळे निष्क्रिय ठरली, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

चौकशी समितीच्या निष्कर्षावरच अग्निशमन तज्ज्ञांनी आक्षेप घेतल्यामुळे डफरीन अग्निकांडाचा तपास आता नव्या वळणावर आला आहे. स्प्रिंकलर प्रत्यक्षात का कार्यान्वित झाले नाहीत, फायर अलार्मची स्थिती काय होती आणि त्या रात्री रुग्णालयातील फायर सेफ्टी यंत्रणेत नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या, याबाबत अधिक स्पष्टता मिळणे गरजेचे आहे.

या प्रकरणात फॉरेन्सिक आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. चौकशी अहवालातील निष्कर्ष आणि प्रत्यक्ष अग्निसुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीमध्ये काही विसंगती आहे का, याचा खुलासा पुढील तपासातून होणार का, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

निष्पाप नवजात बालकांच्या सुरक्षेशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रत्येक तांत्रिक बाबीची सखोल तपासणी होऊन सत्य समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button