AmravaticitynewsFestival News

पटवीपुरात साकारला उज्जैन महाकालेश्वर मंदिराचा भव्य देखावा

बजरंग गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम; दररोज होणार भगवान महाकालांचा विशेष शृंगार

अमरावती : अमरावतीच्या अंबा गेट परिसरातील पटवीपुरा येथे यंदाचा गणेशोत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा मध्य प्रदेशातील प्रसिद्ध श्री उज्जैन महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती आणि देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून भाविकांना अमरावतीतच उज्जैनच्या महाकाल मंदिराची अनुभूती घेता येणार आहे.

उज्जैन येथील महाकाल मंदिरात ज्या पद्धतीने भगवान श्री महाकाल यांचा दररोज आकर्षक शृंगार केला जातो, त्याच धर्तीवर पटवीपुरा येथेही दररोज महाकालांचा विशेष शृंगार करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात हा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

यंदाच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे १४ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी भव्य मिरवणूक. राजकमल चौकातून या मिरवणुकीला सुरुवात होऊन पटवीपुरापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

बजरंग गणेशोत्सव मंडळाला तब्बल ६० वर्षांचा इतिहास असून, गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा महाकालेश्वर मंदिराचा भव्य देखावा साकारून गणेशोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाची तयारी, महाकालेश्वर मंदिराचा देखावा आणि मिरवणुकीबाबत मंडळाचे मार्गदर्शक संजय मापले यांनी माहिती दिली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पटवीपुरा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button