citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात SBI बँकेत दिवसाढवळ्या धाडसी लूट!

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून ४ लाख ५३ हजारांची रोकड लंपास; काही मिनिटांतच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : नागपुरात एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या धाडसी लूट झाल्याने खळबळ उडाली आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून अवघ्या काही मिनिटांत कॅश काउंटरजवळील तब्बल ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला काही वेळातच बेड्या ठोकल्या.

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट परिसरातील एसबीआय शाखेत गुरुवारी सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी बँकेत दोन महिला आणि तीन पुरुष कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज भोजराज बोरकर हा बँकेत दाखल झाला. अचानक त्याने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. या प्रकारामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्याचा फायदा घेत आरोपीने कॅश काउंटरजवळ ठेवलेली ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड घेतली आणि बँकेतून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. आरोपीचा माग काढण्यासाठी डीबी पथकांसह बीट मार्शलला विविध भागांत रवाना करण्यात आले. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला.

अखेर काही वेळातच सूर्योदय रुग्णालयाजवळ पोलिसांना सूरज बोरकर आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून लुटीची संपूर्ण ४ लाख ५३ हजार रुपयांची रक्कम जप्त केली.

विशेष म्हणजे, आरोपी सूरज बोरकर हा बीएससी पदवीधर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बँकेत लूट करण्याचा निर्णय नेमका का घेतला, या घटनेमागे आर्थिक अडचण, पूर्वनियोजित कट किंवा अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दिवसाढवळ्या बँकेत घुसून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत लूट करणाऱ्या आरोपीला काही मिनिटांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे बँक सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला असून, लुटीमागील नेमका हेतू पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button