citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात अवैध गॅस रिफिलिंगविरोधात मोठी धडक कारवाई!

चिखली-कलमना परिसरात भरारी पथकाचा छापा; २०० पेक्षा अधिक गॅस सिलिंडर आढळले, कागदपत्रांची तपासणी सुरू

नागपूर : शहरातील अवैध गॅस रिफिलिंग आणि सिलिंडरच्या अनधिकृत साठवणुकीविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. चिखली-कलमना परिसरात जिल्हाधिकारी नागपूर यांनी गठीत केलेल्या भरारी पथकाने छापा टाकत तब्बल २०० पेक्षा अधिक गॅस सिलिंडर आढळून आणले. या कारवाईमुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ अधिकारी सागर बावरे, वैभव खैरकर आणि पुरवठा निरीक्षक प्रदीप भावे यांच्या पथकाला चिखली-कलमना परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग तसेच मोठ्या प्रमाणात सिलिंडरची साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

माहिती मिळताच भरारी पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी तपासणी केली. या तपासणीदरम्यान घरगुती वापराचे दोन किलो क्षमतेचे सिलिंडर तसेच व्यावसायिक वापरासाठी असलेले सिलिंडर मोठ्या प्रमाणात आढळून आले. एकूण २०० पेक्षा अधिक सिलिंडर घटनास्थळी आढळल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात संबंधित ठिकाणी अनधिकृत पद्धतीने गॅस रिफिलिंग आणि सिलिंडरची साठवणूक होत असल्याचे समोर आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या आढळून आलेल्या सिलिंडरची संख्या, त्यांची क्षमता, कागदपत्रे तसेच संबंधित ठिकाणी करण्यात येणाऱ्या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा ठिकाणी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास आग किंवा स्फोटासारखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शहरात कुठेही अशा प्रकारे अवैध गॅस रिफिलिंग किंवा सिलिंडरची अनधिकृत साठवणूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी ती तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button