धामणगाव रेल्वेत बैलपोळ्याचा पारंपरिक जल्लोष!

सजलेल्या बैलजोडींचे विधिवत पूजन; उत्कृष्ट सजावटीसाठी तीन बैलजोडींना विशेष बक्षिसे, एका जोडीला प्रोत्साहनपर पुरस्कार
धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांच्या जीवनातील जिव्हाळ्याचा आणि कृतज्ञतेचा सण असलेला बैलपोळा धामणगाव रेल्वे शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. सजवलेल्या बैलजोडी, पारंपरिक पूजन आणि आकर्षक सजावटीमुळे नगरपरिषद परिसराला सणाचे सुंदर रूप प्राप्त झाले होते.
बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलजोडींना रंगीबेरंगी गोंडे, झुली, अलंकार तसेच विविध रंगांनी शिंगांची आकर्षक रंगरंगोटी करून सजवले. सजवलेल्या या बैलजोडींना नगरपरिषद परिसरात उभारण्यात आलेल्या सुंदर तोरणाखाली उभे करण्यात आले. त्यानंतर बैलजोडींचे विधिवत पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला.

या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोळा उत्सव समिती आणि नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी सहभाग घेत शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, बैलजोडींच्या आकर्षक सजावटीची पाहणी करून उत्कृष्ट सजावट आणि देखणेपणासाठी तीन बैलजोडींना विशेष बक्षिसे देण्यात आली. तर एका बैलजोडीला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.
बैलपोळा हा केवळ एक सण नसून बैल आणि शेतकरी यांच्यातील अतूट नाते, वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रती व्यक्त केली जाणारी कृतज्ञता आणि ग्रामीण संस्कृतीची परंपरा जपणारा उत्सव आहे. धामणगाव रेल्वेतही याच पारंपरिक भावनेतून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
सिटी न्यूज प्रतिनिधी — संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे



