AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

कारागृहाचे दरवाजे उघडले… अन् चिमुकल्या लेकरांना कैद्यांची भावनिक गळाभेट!

अमरावती मध्यवर्ती कारागृहात ‘गळाभेट’ कार्यक्रम; ६२ बंद्यांची १८ वर्षांखालील ७४ मुलं आणि नातवंडांशी भेट

अमरावती : कारागृहाच्या भिंती शिक्षा देतात… मात्र मायेची गळाभेट मनाला नवी उमेद देते. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी ‘गळाभेट’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात शिक्षा भोगणाऱ्या ६२ बंद्यांना त्यांच्या १८ वर्षांखालील ७४ मुला-मुली आणि नातवंडांची प्रत्यक्ष भेट घेता आली.

कारागृहात बंद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी दूरध्वनी, ई-मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पत्रव्यवहार अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मुलांना आई-वडिलांचा प्रत्यक्ष सहवास, स्पर्श आणि भावनिक आधारही मिळणं आवश्यक आहे. याच भावनेतून कारागृह विभागाकडून मागील दहा वर्षांपासून ‘गळाभेट’ हा उपक्रम राबवला जात आहे.

यंदा अमरावती मध्यवर्ती कारागृहात ६२ बंद्यांच्या ७४ मुला-मुली आणि नातवंडांना आपल्या पालकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं असलेल्या बंद्यांसोबत त्यांच्या १६ पालकांनाही नियमानुसार कारागृहात प्रवेश देण्यात आला. आधारकार्ड तपासणीनंतर ही प्रवेश प्रक्रिया पार पडली.

कैदी आणि कुटुंबीय आमनेसामने येताच कारागृह परिसरात काही काळासाठी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झालं. नेहमीच्या मुलाखतीत जाळीच्या एका बाजूला बंदी आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीय असतात. मात्र, गळाभेट कार्यक्रमात मुलांना आपल्या आई-वडिलांना प्रत्यक्ष भेटता आलं, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता आलं आणि काही काळ त्यांच्यासोबत राहता आलं.

या भेटीदरम्यान काही बंद्यांनी कारागृहाच्या उपहारगृहातून स्वतःच्या वेतनातून बिस्किटं, चॉकलेट आणि इतर खाऊ खरेदी करून आपल्या मुलांना प्रेमाने भरवला. तर कारागृह प्रशासनाकडून मुलांसाठी पुलाव आणि शिराही ठेवण्यात आला होता.

या संपूर्ण उपक्रमामागे केवळ भावनिक भेटीचा उद्देश नसून सुधारणा आणि पुनर्वसनाची भावना आहे. आपल्या मुलांसोबत घालवलेले हे काही क्षण बंद्यांच्या मनात कुटुंबाविषयीची जबाबदारी आणि पुन्हा सामान्य आयुष्याकडे परतण्याची प्रेरणा निर्माण करू शकतात.

कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. ‘वऱ्हाड’ या सेवाभावी संस्थेचंही या उपक्रमाला सहकार्य लाभलं.

कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य भिंतींच्या आत मर्यादित असलं, तरी त्यांचं कुटुंब आणि विशेषतः चिमुकली मुलं या नात्यापासून दूर नसतात. त्यामुळे अशा उपक्रमातून बंद्यांना मायेचा सहवास मिळतो आणि मुलांनाही आपल्या पालकांच्या प्रेमाचा अनुभव घेता येतो.

कदाचित या काही क्षणांच्या गळाभेटीतून एखाद्या बंद्याला आपली चूक सुधारण्याची, गुन्हेगारीचा मार्ग सोडण्याची आणि पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची नवी उमेद मिळू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button