वर्ध्यात गावठी मोहा दारूच्या भट्टीवर पोलिसांची धाड; ७ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

आनंदनगर परिसरात रेल्वे पटरीलगत सुरू होती अवैध दारू निर्मिती; दोन आरोपी पसार, दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
वर्धा, ३० ऑगस्ट २०२६ : वर्धा शहरातील आनंदनगर परिसरात गावठी मोहा दारू निर्मितीच्या भट्टीवर वर्धा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेल्वे पटरीलगत असलेल्या एका टीनाच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गावठी मोहा दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.
पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, टीनाच्या शेडमध्ये गावठी मोहा दारू तयार करण्यासाठी कच्चा मोहा सडवा, उकळव तसेच तयार दारू आणि निर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी ४०० लिटर उकळव, ४ हजार १०० लिटर कच्चा मोहा सडवा रसायन आणि ९० लिटर तयार गावठी मोहा दारू जप्त केली. दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ३१ हजार ३०० रुपये असल्याची माहिती आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालापैकी नाशवंत असलेला सडवा, उकळव आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य याबाबत नियमानुसार पंचनामा करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असताना एजाज खान पठाण आणि एका महिला आरोपीने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. दोन्ही आरोपी तारफैल, वर्धा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यासह पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित वाघमारे, पोलीस अंमलदार रंजित भुरसे आणि पोलीस अंमलदार अमोल साळवण यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वर्धा शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. तसेच अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.



