AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीतील मुथूट फायनान्स सोने गहाण प्रकरणात मोठा खुलासा; २०० हून अधिक नागरिकांचे सोने अडचणीत

शाखा व्यवस्थापकासह तिघांवर कोट्यवधींच्या सोन्याच्या अपहाराचा आरोप; तीन सोनारांकडून सुमारे २ किलो सोने जप्त, १६० हून अधिक तक्रारी

अमरावती : अमरावतीतील मुथूट फायनान्सच्या सोने गहाण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाखेत २०० पेक्षा अधिक नागरिकांनी सोने गहाण ठेवल्याची माहिती असून, शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय याच्यासह तीन आरोपींनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या सोन्याचा अपहार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, नागरिकांनी मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवलेले सोने कथितरित्या खासगी सोनारांकडे ठेवून त्यातून पैसे उचलण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शहरातील तीन नामांकित सोनारांकडे कारवाई केली असून, आतापर्यंत सुमारे दोन किलो सोने जप्त केल्याची माहिती आहे.

या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, १६० हून अधिक नागरिकांनी सिटी कोतवाली पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांचे गहाण ठेवलेले दागिने आणि त्यांचे पैसे या प्रकरणात अडचणीत आले आहेत.

दरम्यान, मुथूट फायनान्स कंपनीची ऑडिट प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी शाखेत येणाऱ्या नागरिकांना प्रत्यक्षात त्यांचे दागिने मिळत नसल्याने त्यांची चिंता आणखी वाढली आहे.

काही नागरिकांना शाखेत प्रवेश देऊन त्यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे पाऊच दाखवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पाऊच दाखवूनही प्रत्यक्ष सोने मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आपल्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेले दागिने अखेर परत मिळणार का, असा सवाल आता पीडित नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास तपास अधिकारी रोशन शिरसाट करत आहेत. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले सोने, आरोपींचे व्यवहार आणि खासगी सोनारांशी असलेले कथित संबंध याबाबत सखोल तपास सुरू आहे.

आता या तपासातून नेमका किती रुपयांचा अपहार झाला, आणखी किती सोने इतरत्र ठेवण्यात आले आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होणार आहे.

मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर नागरिकांचा मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला असून, पीडितांचे सोने नेमके कधी आणि कशा पद्धतीने परत मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button