अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग; नवजात शिशु कक्षातील 3 बालकांचा मृत्यू

पहाटे साडेतीनच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग; 39 बालकांमध्ये उपचार सुरू, 6 बालकांना सुपर स्पेशालिटीमध्ये हलवले
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी नवजात शिशु कक्षात तब्बल 39 बालकांवर उपचार सुरू होते.
आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवरील डॉक्टर, नर्सेस आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अनेक नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 6 बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, या भीषण दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी अफरातफर उडाली. आपल्या चिमुकल्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पालकांची धावपळ सुरू झाली.
दरम्यान, घटनास्थळी माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ताई ठाकूर, माजी महापौर विलास इंगोले आणि माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली तसेच पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला.
आगीचे नेमके कारण काय? व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला? तसेच या दुर्घटनेत काही निष्काळजीपणा झाला का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
अमरावतीतील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेतील पुढील तपास आणि प्रशासनाच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपण पाहत आहात City News.



