मोर्शीत वाघाचा थरार; शेतकऱ्यावर हल्ला, दुर्दैवी मृत्यू

आष्टीनंतर आता भांभोरा गावात वाघाचा हल्ला; वनविभाग आणि रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरू
मोर्शी : मोर्शी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भांभोरा गावात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चरणदासजी इखे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, नागपंचमीच्या दिवशी आष्टी परिसरातही याच वाघाने एका इसमावर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चरणदासजी इखे हे शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक, पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
दरम्यान, वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून परिसरात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वाघाचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, तसेच हा वाघ आष्टी परिसरातील घटनेतीलच आहे का, याचा तपास वनविभागाकडून केला जात आहे.
नागपंचमीच्या दिवशी आष्टी परिसरातही वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असल्याने नागरिकांमध्ये अधिकच दहशत निर्माण झाली आहे. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.
वाघाचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वनविभाग आणि रेस्क्यू टीमकडून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे भांभोरा आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वाघाचा बंदोबस्त कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



