शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा आरोप

हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयातील धक्कादायक घटना; विद्यार्थी गंभीर जखमी, पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवले
मेहकर, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे.
मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे. मारुती पेठ येथील तन्मय समाधान खंडागळे हा विद्यार्थी या विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
तन्मयच्या एका पुस्तकावर दहा अंकी मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. त्यावरून त्याने शिक्षक राहुल जाधव यांना सर, हा नंबर लागेल का? असा सहज प्रश्न विचारला. यावेळी काही विद्यार्थी हसल्याने शिक्षकाला आपला अपमान झाल्याचे वाटले आणि त्यानंतर तन्मयला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मारहाणीनंतर तन्मयने घरी आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यासाठी मोबाईल मागितला. मात्र, त्याला मोबाईल देण्यात आला नाही आणि घरी संपर्क करू दिला नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
शाळा सुटल्यानंतर तन्मय घरी पोहोचला आणि त्याने संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर तन्मयला घबराटीसह असह्य वेदना होत असल्याने त्याला जानेफळ येथील राठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा, कानामागे लालसरपणा आणि डोक्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकाविरोधात जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जानेफळ येथे पाठवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज ठाकरे यांनी तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले.
मात्र, वृत्त हाती येईपर्यंत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आणि शिक्षण विभागाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांच्यावर अशा प्रकारे मारहाण होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण व्यवस्थेबद्दल भीती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती आणि घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पाहूया सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा सविस्तर रिपोर्ट.
जिजामाता विद्यालयातील या कथित मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जखमी विद्यार्थी तन्मय खंडागळे याची प्रकृती आणि या प्रकरणात पोलीस तसेच शिक्षण विभागाकडून होणारी पुढील कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.



