बडनेरा नवी वस्तीमध्ये १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलाद उत्साहात

भव्य जुलूसातून अमन, शांती, भाईचारा आणि मानवतेचा संदेश; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत समाजबांधवांचा मोठा सहभाग
बडनेरा : पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त बडनेरा नवी वस्तीमध्ये १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला. अमन, शांती, भाईचारा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या जुलूसमध्ये बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले.
जमा मशिदीतून या भव्य जुलूसला सुरुवात झाली. रेस्ट हाऊस रोड, चांदणी चौक, जय हिंद चौक, जस्तंभ चौक, शिवाजी चौक, आझाद चौक आणि झंझाडपुरा मार्गे जुलूस पुन्हा जमा मशिदीत पोहोचला.
जुलूसदरम्यान पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या शानमध्ये नात शरीफ सादर करण्यात आली. यावेळी अमन, शांती, भाईचारा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
आझाद चौक येथे सामाजिक कार्यकर्ते अकरम देशमुख आणि इरफान मेमन यांच्या वतीने समाजबांधवांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले.
यानंतर जुलूस पुन्हा जुम्मा मशिदीत पोहोचल्यानंतर इमाम खतीब यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. रूह अफरोज बयानानंतर शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या भव्य जुलूसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक एकता, भाईचारा आणि मानवतेचा संदेश देणारा बडनेरा येथील १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलादचा भव्य जुलूस विशेष ठरला. शांतता आणि सलोख्याचा संदेश देत या कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.



