citynewsLatest NewsMaharashtraMumbai

औंढा नागनाथ मंदिराचा होणार भव्य विकास!

१९३.५५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरासाठी ७२.४९ कोटींची तरतूद

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला आता मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

मंदिराच्या पुरातन शिल्पकलेचे जतन करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा, तसेच मंदिर परिसरातील दगड, बांधकाम साहित्य आणि इतर सर्व कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

औंढा नागनाथ मंदिर परिसराचा कायापालट होणार

औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी यांचे संवर्धन केले जाणार आहे.

यासोबतच हरीहर तलाव आणि परिसरातील इतर मंदिरांचे संवर्धन, बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकासाची कामेही केली जाणार आहेत.

भाविकांसाठी मोठ्या सुविधा

मंदिर परिसरात नव्याने भक्त निवास उभारण्यात येणार असून, तब्बल २,५०० भाविकांच्या क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष तयार केला जाणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यासाठी दर्शन रांगेचे नियोजन करण्यात येणार आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, दगडी बांधकामाचा लूक, माहिती केंद्र आणि परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्तींचे दर्शन घडवण्यासाठी संग्रहालय उभारण्याचेही नियोजन आहे.

नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरासाठी ७२.४९ कोटींचा आराखडा

नागपूरच्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर, महाल परिसराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ७२.४९ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यालाही शिखर समितीने मंजुरी दिली.

मंदिर परिसरातील पार्किंगची क्षमता वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मात्र, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगऐवजी साध्या पार्किंगची व्यवस्था अधिक व्यवहार्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुधारित आराखड्यात बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे.

हेमाडपंथी शैलीत मंदिर परिसराचे सुशोभीकरण

कल्याणेश्वर मंदिर परिसरात हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसादाची सुविधा, प्रशासकीय कार्यालय, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

शिवसृष्टी प्रकल्पासाठी ५० कोटींचा निधी

पुण्याजवळील आंबेगाव येथे विकसित होत असलेल्या शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्कच्या चौथ्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

औंढा नागनाथ, नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि पुण्याची शिवसृष्टी या तिन्ही प्रकल्पांना मिळालेली मंजुरी धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button