citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

गोधनीत क्लोरिन गॅसची गळती; 40 जण रुग्णालयात दाखल

जलशुद्धीकरण प्रकल्पातील सिलिंडरमधून मध्यरात्री गॅसगळती; 3 रुग्ण ICUमध्ये, परिसरातील 200 मीटर भाग सील

नागपूर | प्रतिनिधी

नागपूरच्या गोधनी परिसरातील फागुजी नगरमध्ये मध्यरात्री क्लोरिन गॅसची गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली. गोधनी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील रिझर्व्ह क्लोरिन सिलिंडरमधून रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक गॅस गळती झाल्याची माहिती आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्पाला लागूनच मोठी वसाहत असल्याने गॅसचा प्रभाव परिसरातील घरांपर्यंत पोहोचला. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या घटनेत तब्बल 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यापैकी 13 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, 3 रुग्णांवर ICUमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये एका बालकाचाही समावेश असून, या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, NDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सुमारे 200 मीटरचा परिसर रिकामा करून सील केला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कामही सुरू करण्यात आले.

गॅसच्या संपर्कात आल्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याची माहिती असून, दुसऱ्या कुत्र्याला नागरिकांनी सुरक्षितपणे वाचवले.

दरम्यान, गॅसगळती झाली त्यावेळी जलशुद्धीकरण प्रकल्पात कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती समोर आल्याने प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सद्यस्थितीत क्लोरिन गॅसची गळती पूर्णपणे थांबवण्यात आली असून, आरोग्य विभागाच्या पथकांकडून परिसरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे.

मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोधनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गॅसगळतीचे नेमके कारण आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा तपास आता प्रशासनाकडून केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button