AmravatiamravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’चा जयघोष; हजारो नागरिकांची भव्य तिरंगा रॅली

नेहरू मैदानातून रॅलीला सुरुवात; गांधी आणि डॉ. आंबेडकरांना अभिवादन, तिरंगा प्रतिज्ञेसह अवयवदानाची शपथ

अमरावती | प्रतिनिधी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अमरावती शहरात बुधवारी १२ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हजारो अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. हातात तिरंगा आणि देशभक्तीच्या घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले.

नेहरू मैदानातून रॅलीला सुरुवात

दुपारी चार वाजता नेहरू मैदान येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक मार्गे मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला.

रॅलीमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गांधी आणि डॉ. आंबेडकरांना अभिवादन

रॅलीदरम्यान जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इर्विन चौक येथे विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

हजारो नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन दिलेल्या देशभक्तीच्या घोषणांमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले.

तिरंगा प्रतिज्ञेसह अवयवदानाची शपथ

रॅलीच्या समारोपावेळी उपस्थित नागरिकांनी तिरंगा प्रतिज्ञा आणि अवयवदानाची शपथ घेतली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या शेवटी रंगीबेरंगी तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला आणखी आकर्षक स्वरूप प्राप्त झाले.

‘प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा’

यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी प्रत्येक अमरावतीकराने आपल्या घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी ही केवळ तिरंगा रॅली नसून देशप्रेमाची अभिव्यक्ती, एकतेचा संदेश आणि राष्ट्रभक्तीचा सजीव उत्सव असल्याचे सांगितले.

१५ ऑगस्टपर्यंत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

१५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी घरे, कार्यालये, दुकाने आणि संस्थांवर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवावा, तसेच राष्ट्रध्वजाच्या सन्मानासंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

रॅलीला महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महापालिकेच्या बांधकाम, शिक्षण, बाजार व परवाना आणि अग्निशमन विभागाने विशेष मेहनत घेतली.

‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक हृदयात भारताचा अभिमान जागवण्याचा संदेश अमरावतीतील या भव्य रॅलीतून देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button