Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraMumbaiPune

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार; दोन वाहने दरीत कोसळली

भरधाव कंटेनरची टेम्पोला मागून धडक; कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू, टेम्पो चालक जखमी

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा बोरघाट परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. भरधाव मालवाहू कंटेनरने पाठीमागून टेम्पोला जोरदार धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळली. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी सुमारे ८.३० वाजता मुंबई लेनवरील किलोमीटर क्रमांक ३९ च्या आसपास, खोपोली हद्दीतील बोरघाट परिसरात घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर टेम्पो जात असताना मागून आलेल्या कंटेनरने टेम्पोला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

धडकेनंतर दोन्ही वाहने अनियंत्रित झाली. कंटेनर खोल दरीत कोसळला, तर टेम्पोही दरीच्या दिशेने जाऊन अडकला. या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या अपघातात टेम्पो चालक मिराज शेख जखमी झाला असून तो बचावला आहे. टेम्पो वरच्या बाजूला अडकल्यामुळे त्याचा जीव वाचल्याची माहिती आहे. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, अ‍ॅफकॉन्स कंपनीची टीम, महाराष्ट्र सुरक्षा बल, 108 रुग्णवाहिका, लोकमान्य हॉस्पिटल, हेल्प फाऊंडेशनचे सदस्य तसेच बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही वाहने दरीत कोसळल्यामुळे बचावकार्य मोठ्या आव्हानाचे ठरले. बचाव पथकांनी परिस्थिती हाताळत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास महामार्ग वाहतूक पोलीस करीत आहेत. भरधाव कंटेनर, धडक आणि त्यानंतर दोन्ही वाहनांचे दरीत कोसळणे या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

Published by – Chanchal Bhakare

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button