घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकल्याला कारची धडक; महिला चालकाविरुद्ध गुन्हा

अपघातानंतर चालक महिलेनेच जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले; कार पोलिसांनी जप्त केली
नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चिमुकला जखमी झाला असून, या प्रकरणी ३४ वर्षीय महिला कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील कारही पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी सचिन हरिभाऊ देशमुख यांचा चार वर्षांचा मुलगा २३ तारखेला सायंकाळी सुमारे पाच वाजता घरासमोर खेळत होता. त्याचवेळी MH 49 DA 0744 क्रमांकाच्या कारने चिमुकल्याला धडक दिली. या अपघातात मुलगा जखमी झाला.
धडक झाल्यानंतर कारचालक महिलेनेच जखमी मुलाला उपचारासाठी भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर फिर्यादी आणि कारचालक महिलेच्या कुटुंबीयांमध्ये आपसात तडजोड करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने फिर्यादीने पोलीस ठाणे गाठत कारचालक महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीची तक्रार नोंदवून संबंधित ३४ वर्षीय महिला कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असून, अपघातातील कारही ताब्यात घेतली आहे.
या अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहन चालवण्याची स्थिती आणि घटनेतील इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. जखमी चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत.



