Amravati GramincitynewsLatest NewsMaharashtra

भातकुली आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने प्रश्नचिन्ह

प्रिया मावसकर प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी; आश्रमशाळेच्या अध्यक्ष, संचालक आणि अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

अमरावती : भातकुली तालुक्यातील मातोश्री गोराबाई गुढे आदिवासी आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनी प्रिया गणेश मावसकर हिच्या मृत्यूच्या प्रकरणाने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी आंदोलन कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या प्रिया मावसकरची २४ सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला प्रथम भातकुली येथे उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अमरावतीतील पारिजात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

निवेदनात नमूद वैद्यकीय माहितीनुसार, प्रियावर उपचार सुरू असताना Cardiogenic Shock, Dilated Cardiomyopathy, LV Dysfunction, DIC आणि AKI अशी वैद्यकीय स्थिती निदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद आहे.

या प्रकरणात नेमकी परिस्थिती काय होती, विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले का, उपचारात कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा झाला का, तसेच आश्रमशाळेने विद्यार्थिनीच्या देखभालीची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रियाच्या शवविच्छेदनासाठी तिच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याची माहिती अमरावती आदिवासी विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.

या प्रकरणाची दखल घेत संबंधित आश्रमशाळेचे अध्यक्ष, संचालक आणि अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आदिवासी विभागाकडून देण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाकडून कोणताही नियमभंग किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रियाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि तिची प्रकृती बिघडल्यापासून उपचारादरम्यानची संपूर्ण परिस्थिती निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट होण्याची मागणी होत आहे. प्रशासनाच्या चौकशीतून या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button