अमरावतीत मालवाहू वाहनांना शहरातील प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदीचा प्रस्ताव

वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा निर्णय; सकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत निर्बंध
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मालवाहू वाहनांच्या शहरातील प्रवेशावर निर्बंध घालण्याची प्रस्तावित अधिसूचना जारी केली आहे. या प्रस्तावानुसार शहरातील प्रमुख मार्गांवर हलक्या तसेच जड मालवाहू वाहनांना सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे.
तीन वर्षांत १,१०८ अपघात
अमरावती शहरातील अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत शहरात तब्बल १,१०८ अपघात झाल्याची माहिती आहे.
यापैकी २१२ अपघात प्राणघातक ठरले असून, त्यात २४६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ९१३ जण जखमी झाले आहेत. वाढती वाहतूक आणि अवजड वाहनांमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन वाहतुकीवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
कोणत्या वाहनांना प्रवेशबंदी?
प्रस्तावित अधिसूचनेनुसार, शहरातील प्रमुख मार्गांवर पुढील वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी राहणार आहे—
- दोन टनांपेक्षा अधिक वजनाची मालवाहू वाहने
- दोन टनांपेक्षा अधिक भारवाहक क्षमतेची वाहने
- मल्टी ॲक्सल अतिजड वाहने
या वाहनांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यास अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
प्रमुख मार्गांचा समावेश
प्रवेशबंदीच्या प्रस्तावित यादीत गौरी इन वा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक आणि नवाथे चौक यांसह शहरातील अनेक प्रमुख मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.
या मार्गांवर सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या कालावधीत संबंधित मालवाहू वाहनांना प्रवेश करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवांना सूट
मात्र, अत्यावश्यक सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस वाहतूक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, महापालिकेची कचरा संकलन वाहने तसेच शासकीय धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू राहणार नाही.
तसेच अन्नधान्य आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ठराविक मार्गांवर प्रवेशाची परवानगी देण्यात येणार आहे.
नागरिकांना आक्षेप-सूचना देण्याची संधी
ही अधिसूचना सध्या प्रस्तावित स्वरूपात असून, नागरिक आणि वाहनधारकांना याबाबत आक्षेप किंवा सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
प्रस्तावावर कोणाला आक्षेप किंवा सूचना असल्यास सात दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पोलीस प्रशासनाकडे सादर करता येणार आहेत.
प्रस्तावित निर्बंध लागू झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी कमी करणे, अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणणे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.



