citynewsLatest NewsMaharashtraWardha

धनोडी-नांदपूर येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप

वर्षभरापूर्वी धोकादायक इमारतीचा इशारा दिल्याचा दावा; नवीन शाळा इमारतीची मागणी

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धनोडी (नांदपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री घडल्याने शाळा बंद होती आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती वर्षभरापूर्वीच संबंधित प्रशासनाला देण्यात आली होती, असा दावा करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनोडी (नांदपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचा स्लॅब रात्री अचानक कोसळला. सुदैवाने विद्यार्थी किंवा शिक्षक उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेनंतर ग्रामस्थ अरविंद लिल्लोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, शाळेची इमारत धोकादायक झाल्याबाबत मुख्याध्यापिका रेखा हिवाळे आणि सरपंच कोमल सागर कोल्हे यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पंचायत समिती आर्वी आणि जिल्हा परिषद वर्धा यांना लेखी स्वरूपात कळविले होते.

याशिवाय, जुनी इमारत पाडून नवीन शाळा इमारत उभारण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरत असून, विद्यार्थ्यांना अवघ्या एका वर्गखोलीत शिक्षण दिले जात आहे. शाळेत दोन शिक्षिका कार्यरत असून इमारतीच्या असुरक्षित स्थितीमुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीही कमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या मते, ही घटना दिवसा घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन शाळा इमारतीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पुढील कार्यवाहीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button