citynewsLatest NewsMaharashtraWardha

विजयगोपाळ बँक प्रकरणात आमदार राजेश बकाने यांच्यासह सर्व 10 आरोपी निर्दोष

बँक व्यवस्थापकावर शाईफेक व मारहाणीच्या आरोपप्रकरणी दहा वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील गाजलेल्या विजयगोपाळ बँक प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने यांच्यासह सर्व 10 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बँक व्यवस्थापकावर शाईफेक आणि मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी तब्बल दहा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल अखेर जाहीर झाला असून, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा व ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

हे प्रकरण जुलै 2016 मधील असून, देवळी तालुक्यातील विजयगोपाळ येथील बँकेत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मंजुरीस विलंब होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी बँकेला भेट देऊन व्यवस्थापकांकडे याबाबत जाब विचारला होता.

यावेळी झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकावर शाईफेक आणि मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर आमदार राजेश बकाने यांच्यासह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण न्यायालयात दाखल झाले.

सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सर्व बाबींचा सखोल विचार केल्यानंतर आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असा ठोस व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आमदार राजेश बकाने यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार राजेश बकाने यांनी आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठविला होता आणि न्यायालयाने सत्याची बाजू मान्य केल्याचे सांगितले.

दरम्यान, या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, तब्बल दहा वर्षांनंतर या गाजलेल्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागल्याने संबंधित आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button