नागपुरात कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; विदेशी महिलांसह पाच पीडितांची सुटका, ५.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत उझबेकिस्तानमधील दोन महिलांसह एकूण पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळपेठ परिसरात विदेशी आणि परराज्यातील महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून कथित देहव्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार बोगस ग्राहकाच्या (डिकॉय पंटर) मदतीने सापळा रचून कारवाई करण्यात आली.
प्राथमिक तपासात “लॉगिन पर्सनल मिटिंग” या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहक उपलब्ध करून दिले जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत सचिन माणिकराव महाजन याला अटक करण्यात आली असून समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाच्या महिलेचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी उझबेकिस्तानमधील दोन महिलांसह पंजाब, दिल्ली आणि कोलकाता येथील तीन महिलांची सुटका केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या महिलांना कमी वेळात अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून त्यांना ग्राहक उपलब्ध करून दिले जात होते. आरोपी आर्थिक फायद्यासाठी महिलांना कथित देहव्यापारात प्रवृत्त करत असल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
या कारवाईत स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून सर्व संबंधित बाबींचा सखोल तपास केला जात आहे.



