citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

धुंडा मारुती मंदिरात विषारी नागाचा शिरकाव; सर्पमित्राच्या तत्परतेने संकट टळले

मंदिरातील पुजाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; नागाला सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील धुंडा मारुती मंदिरात गुरुवारी सायंकाळी विषारी नाग आढळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मंदिरातील पुजाऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्राच्या तत्पर कारवाईमुळे नागाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात देऊन पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली.

माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मंदिरातील पुजारी ओम मिश्रा हे नेहमीप्रमाणे दिवा लावण्यासाठी गेले असता त्यांना मंदिर परिसरात एक मोठा विषारी नाग दिसला. नाग शंकर मंदिराच्या मागील बाजूस सरकत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सतर्कता बाळगत आपल्या आईला आवाज दिला आणि परिसरातील नागरिकांना सावध केले.

यानंतर मंदिराचे वरिष्ठ पुजारी दिलीप मिश्रा यांनी त्वरित सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत शुभम पराळे घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक जमा झाले होते. शोधमोहीमेदरम्यान नाग मंदिरातील मार्बलच्या मागे लपल्याचे आढळून आले. काही काळाच्या प्रयत्नांनंतर सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने नागाला सुरक्षितपणे पकडले.

यानंतर नागाला सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवून नागपूर येथील सेमिनरी हिल्स वनविभागीय ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे नेण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक पंचनामा करून नाग त्यांच्या ताब्यात देण्यात आला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, पावसाळ्यात सापांचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा किंवा मातीचे ढीग साचू देऊ नयेत तसेच साप आढळल्यास त्याला इजा न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button