नागपुरात घरफोडीचा पर्दाफाश; आरोपी ताब्यात, वाहनचोरीचाही गुन्हा उघड

गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई; ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पुढील तपास सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट-६ ने पर्दाफाश केला असून तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान घरफोडीसह कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचोरीचाही गुन्हा उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या घराला कुलूप लावून मुंबईला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण ३ लाख ८२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून लोखंडी धारदार चाकू जप्त करण्यात आला. सखोल चौकशीत आरोपीने साथीदारांसह घरफोडी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, चौकशीदरम्यान कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचोरीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला असून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून गुन्हे शाखा युनिट-६ ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.



