नागपुरात तरुणाला मारहाण करून दुचाकी व आयफोन लुटला; २४ तासांत चार आरोपी जेरबंद

पाचपावली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फरार आरोपींचा शोध सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला मैत्रिणीच्या नावावरून गाठून मारहाण करत त्याची दुचाकी आणि आयफोन लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पाचपावली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मैत्रिणीला वारंवार फोन करणाऱ्या एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेला होता. त्याचवेळी मुख्य आरोपी आदित्य कोचे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील बर्गमन दुचाकी आणि आयफोन १३ मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या २४ तासांत चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली बर्गमन दुचाकी, आयफोन १३, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली तसेच चार मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या पाचपावली पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



