citynewsLatest NewsMaharashtraMumbaiPuneWeather Report

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; पूर, दरडी, वाहतूक विस्कळीत

रेड अलर्टनंतर प्रशासन सतर्क; एनडीआरएफकडून २५ नागरिकांची सुटका, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती, दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगत विविध ठिकाणी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक संथ गतीने पुन्हा सुरू करण्यात आली.

दरडी कोसळल्यामुळे पुणे–मुंबई एसटी बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली. तसेच रेल्वेमार्गावर पाणी साचणे आणि घाट परिसरातील दरडींमुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मावळ तालुक्यातही पावसाने रौद्ररूप धारण केले. जुन्या मुंबई–पुणे महामार्गासह द्रुतगती मार्गावर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आणि वाहतूक विस्कळीत झाली. हिंजवडीजवळील जांभे गावात पवना नदीला पूर आल्याने अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या जवानांनी बोटींच्या साहाय्याने २५ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथेही इंद्रायणी नदीला पूर आल्याने घाट, भक्त पुंडलिक मंदिर आणि नदीकाठावरील अनेक दुकाने पाण्याखाली गेली. सुरक्षेच्या कारणास्तव नदीवरील प्रमुख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मोरया गोसावी गणपती मंदिर परिसरात पुराचे पाणी शिरले. मंदिराचा मोठा भाग पाण्याखाली गेल्याने मंदिर प्रशासनाने दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सततच्या पावसामुळे सिंहगड घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने ६ आणि ७ जुलै रोजी पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसेच शहरातील वाकडेवाडी परिसरात मोठे झाड कोसळून चारचाकी, रिक्षा आणि दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याशिवाय, खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण परिसरातील पावसाची तीव्रता कायम राहिल्यास येत्या काही तासांत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, हवामान व प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button